Shishyavrutti Pralambit Vidyarthi Pariksha Kagadapatre Rokhane Pratibandh
Shishyavrutti Pralambit Vidyarthi Pariksha Kagadapatre Rokhane Pratibandh
Shishyavrutti Rakkam Pralambit Vidyarthi Pariksha Shaikshanik Kagadapatre Rokhun Thevane Pratibandh
shishyvrutti rakkam pralambit vidyarthyanna parikshela basnyas pratibandh shaikshanik kagadapatre rokhun thevanyas pratibandh
“शिष्यवृत्ती अथवा शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम प्रलंबित असल्याच्या कारणास्तव विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास प्रतिबंध करणे अथवा शैक्षणिक कागदपत्रे रोखून ठेवण्यास प्रतिबंध करण्याबाबत.”
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०२६/प्र. क्र. ७२ (ई- १९३५२६५)/ एसडी-५
मंत्रालय (विस्तार), मुंबई
दिनांक:- २७ नोव्हेंबर, २०२६.
वाचा:-
१. आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र. शिष्यवृ- २०२६/प्र.क्र.११३/का.१२, दि. २६.१०.२०२६
२. मा. श्री विवेक पंडीत, अध्यक्ष (मंत्री दर्जा) राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती, महाराष्ट्र राज्य यांचे दि. २४.१०.२०२६ चे निवेदन.
प्रस्तावना:-
राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना तसेच शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीच्या योजना राबविण्यात येतात. तथापि, काही प्रकरणांमध्ये शिष्यवृत्ती अथवा शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम प्रलंबित असल्याच्या कारणास्तव संबंधित शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांकडे शुल्क भरण्याची मागणी करण्यात येत असल्याचे तसेच शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रतिबंध करणे किंवा त्यांची शैक्षणिक कागदपत्रे रोखून ठेवणे अशा स्वरूपाच्या तक्रारी शासनाच्या निदर्शनास येत आहेत. आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णय क्र. शिष्यवृ-२०२६/प्र.क्र.११३/का. १२, दिनांक २६ ऑक्टोबर, २०२६ अन्वये शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीच्या अभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही, याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व शैक्षणिक संस्थांना सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक :-
१. विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा शिक्षण शुल्क
प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून प्राप्त झाली नसल्याच्या किंवा संबंधित प्रस्ताव प्रलंबित असल्याच्या कारणास्तव कोणत्याही पात्र विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षा, राज्य परीक्षा मंडळाच्या परीक्षा अथवा अन्य शैक्षणिक परीक्षांना बसण्यास प्रतिबंध करण्यात येऊ नये. तसेच परीक्षा अर्ज भरणे, परीक्षा प्रवेशपत्र मिळविणे किंवा अन्य शैक्षणिक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यात येऊ नये.
२. शैक्षणिक कागदपत्रे रोखून ठेवू नयेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अथवा शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम प्रलंबित असल्याच्या कारणास्तव विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (Leaving Certificate), गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, निकालपत्र अथवा अन्य कोणतीही शैक्षणिक कागदपत्रे रोखून ठेवण्यात येऊ नयेत.
३. शुल्क वसुलीबाबत : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या संबंधित शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनांच्या तरतुदींनुसार पात्र विद्यार्थ्यांकडून प्रतिपूर्तीयोग्य शुल्काची आगाऊ वसुली करून त्यांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवण्यात येऊ नये. संबंधित योजनांच्या शासन निर्णयातील तरतुदींचे पालन करणे संस्थांवर बंधनकारक राहील.
४. तक्रार निवारण यंत्रणा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वरील कारणांमुळे कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी खालीलप्रमाणे तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी.
अ.क्र. स्तर तक्रार निवारण अधिकारी तक्रार निवारणाची कालमर्यादा
१. संस्थास्तर
मुख्याध्यापक / प्राचार्य
३ कार्यदिवस
२. तालुका जिल्हास्तर/
शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक)
७ कार्यदिवस
३. विभागीय स्तर
विभागीय शिक्षण उपसंचालक
७ कार्यदिवस
४. राज्यस्तर
शिक्षण संचालक (प्राथमिक /माध्यमिक)
आवश्यकतेनुसार तातडीने हस्तक्षेप संबंधित अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारींची नोंद ठेवावी व निर्धारित कालमर्यादेत त्यांचे निराकरण करावे. तक्रारींचे निराकरण न झाल्यास त्या प्रकरणांचा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा.
५. जबाबदारी व कार्यवाही सदर परिपत्रकातील निर्देशांचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखणे, शैक्षणिक कागदपत्रे रोखून ठेवणे अथवा शैक्षणिक नुकसान होईल अशी कोणतीही कृती करणे निदर्शनास आल्यास संबंधित संस्थेच्या प्रमुखाची जबाबदारी निश्चित करून प्रचलित अधिनियम, नियम व शासन निर्णयांनुसार योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल.
६. अनुपालन: सर्व शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या शाळांना निदर्शनास सदर परिपत्रक आणावे व त्याची काटेकोर अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२६११२७१८३६५६८९४९ असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उप सचिव, महाराष्ट्र शासन