Implementation Of New Curriculum And Syllabus
Implementation Of New Curriculum And Syllabus
बालभारतीची पुस्तके खरेदी करताय? सावधान,ही पुस्तके बदलणार, नोंदवही बंधनकारक
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीतर्फे उपलब्ध करून दिली जाणारी पुस्तके यावर्षी बदलणार आहेत. त्यामुळे बालभारतीची कोणती पुस्तके घ्यावीत आणि कोणती घेऊ नयेत, याबाबत बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार 2026-27 या शैक्षणिक वर्षात जून 2026 मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, आणि सहावीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार आहेत, त्यामुळे पालकांनी ही नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करावीत.
शैक्षणिक वर्ष 2026-27 हे इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार आहे. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी, अशा सूचना बालभारतीतर्फे संबंधितांना करण्यात आल्या आहेत. इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमासाठी ‘शिकू मराठी आनंदे’ तसेच हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधू, तेलगू, तमिळ व बंगाली या इतर माध्यमांसाठी ‘करू मैत्री मराठीशी’ ही मराठी भाषेची अनिवार्य पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
इयत्ता सहावी साठी हिंदी सुलभभारती व हिंदी सुगमभारती तसेच सुगमभारती (कन्नड संयुक्त) तारुफे उर्दू, सिंधू भारती अरे / देव, तेलुगु सरल भारती, गुजराती साहित्य परिचय ही पुनर्मुद्रण (जुन्या अभ्यासक्रमाची) वैकल्पिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.इयत्ता पाचवी, सातवी व इयत्ता आठवीच्या एकात्मिक व नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय मूल्यमापन योजना समान आहे. तसेच ही दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित आहेत. ही पाठ्यपुस्तके भांडारात शिल्लक असून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इयत्ता नववी ते बारावी साठी विषय योजना व मूल्यमापन योजनेनुसार विद्यार्थ्यांनी या इयत्ता साठी बालभारतीने तयार केलेल्या प्रात्यक्षिक नोंदवही चा वापर करणे बंधनकारक राहील कोणत्याही शैक्षणिक संस्थेने खाजगी प्रकाशकांच्या प्रात्यक्षिक नोंदवही चा वापर करण्याचे बंधन किंवा शक्ती विद्यार्थ्यांवर करू नये.
पाठ्यपुस्तक महामंडळातर्फे महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केलेली आहे या स्वाध्याय पुस्तिकांच्या दर्शनी किमतीवर 40% सूट देण्यात येत आहे तरी विद्यार्थ्यांनी या स्वाध्यायपुस्तिकांचा वापर करावा, असे आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केले आहे.
———— ALSO READ ————–
राज्यात सन २०२५-२६ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी टप्प्या-टप्याने करणेबाबत.
दिनांक :- १४ जुलै, २०२५
संदर्भ :-
१) राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२०
२) शासन अ. शा. पत्र क्र. २०२२/प्र.क्र.४९/एसडी-६. दिनांक २२ मार्च, २०२२
३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकिर्ण-२०२२/प्र.क्र.४९/एसडी-६, दिनांक २४ जून, २०२२
४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकिर्ण-२०२२/प्र.क्र.८८/एसडी-६, दिनांक १६ जानेवारी, २०२३
५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकिर्ण-२०२३/प्र.क्र.४६/एसडी-४. दिनांक २४ मे, २०२३
६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकिर्ण-२०२३/प्र.क्र.४६/एसडी-४, दिनांक ०२ जानेवारी, २०२४
७) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकिर्ण-२०२३/प्र.क्र. ४६/एसडी-४.
दिनांक ०५ फेब्रुवारी, २०२५
८) राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४
९) पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम – २०२४
१०) राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४
११) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र क्र. राशैसंप्रपम /अविवि / सुकाणू / २०२५/०१३६५, दिनांक १०.०३.२०२५
१२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.२०/एसडी-४, दिनांक १९ मे,२०२५
प्रस्तावना :-
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे एकविसाव्या शतकातील पहिले शिक्षण धोरण आहे. स्वातंत्र्योत्तर काळात १९६४-१९६६ मध्ये कोठारी आयोग व १९८६ मध्ये आलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण यामुळे राज्य व देशातील शिक्षणामध्ये अनेक सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. आता जवळपास ३४ वर्षांनंतर केंद्रिय मंत्रिमंडळाच्या दिनांक २९ जुलै, २०२० रोजीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० ला मंजुरी देण्यात आलेली आहे. या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पूर्वीच्या १०+२+३ या रचनेमध्ये बदल करून ५+३+३+४ याप्रमाणे रचनात्मक बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये पायाभूत स्तरापासून पदवी स्तरांपर्यतच्या शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. सदर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.९४/एस.डी.-४
टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी सुरु आहे. सर्वांना सहज शिक्षण, समता, गुणवत्ता, परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच मूलभूत स्तंभांवर उभारलेले हे धोरण संविधानिक मूल्यांवर आधारित आहे. तसेच सन २०३० पर्यंत साध्य करावयाच्या शाश्वत विकासाच्या ध्येयांशी हे धोरण जोडले गेलेले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या अंमलबजावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या कार्याच्या अनुषंगाने संदर्भ क्र. ३ येथील दिनांक २४ जून, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. तसेच या शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबलावणी करण्यासाठी संदर्भ क्र. ४ येथील दिनांक १६ जानेवारी, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अ. मु. स. / प्रधान सचिव / सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली आंतरविभागीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अनुसार ५+३+३+४ आकृतीबंधातील शिक्षणाचे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण (ECCE) यावर आधारित पायाभूत स्तर तसेच शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण व प्रौढ शिक्षण या घटकांचे अवलोकन करून राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची गुणवत्तापूर्ण व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली संदर्भ क्र. ५ येथील दिनांक २४ मे, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये संदर्भ क्र. ६ व ७ येथील शासन निर्णयान्वये नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२३ आधारित तयार केलेल्या पुस्तकांचा देशातील २३ राज्यांकडून वापर करण्यात येत आहे. या पाठ्यपुस्तकांची निर्मिती देशभरातील विविध क्षेत्रातील नामवंत, अनुभवी तज्ञ यांच्याकडून करण्यात आली आहे. या पाठ्यपुस्तकांवर आधारित राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते. देशभरात ही पाठ्यपुस्तके विविध मंडळांच्या शाळांमधून वापरण्यात येतात. मा. मंत्री (शालेय शिक्षण), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समिती, शिक्षण क्षेत्रातील नामवंत व अनुभवी तज्ञ यांनी साकल्याने विचार करून, महाराष्ट्र राज्यातही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेली इयत्तानिहाय त्या त्या विषयाची पाठ्यपुस्तके टप्प्या-टप्प्याने आवश्यक त्या बदलासह व संदर्भीकरणासह वापरण्याचे निश्चित केले आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२२ वर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४ व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (State Council of Educational Research and Training. Maharashtra), पुणे यांचेमार्फत तयार करण्यात आले आहेत. तसेच, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२३ वर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ तयार करण्यात आला आहे. शालेय शिक्षण अभ्यासक्रम २०२५ ची निर्मिती सुरु आहे.
राज्यस्तरीय सुकाणू समितीने राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४. पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ यांना मान्यता प्रदान केलेली आहे. या दृष्टिने पायाभूत स्तर व शालेय शिक्षण स्तराच्या सर्व उपस्तरांसाठी या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (State Council of Educational Research And Training, Maharashtra), पुणे यांचेमार्फत तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन २०२८-२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी, सदर कालावधीपूर्वी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत विशेष प्रयत्न घेण्यात यावेत.
राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अंगणवाड्यांमधील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाबाबतचा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने संदर्भ क्र. १२ येथील दिनांक १९ मे, २०२५ अन्वये निर्गमित करण्यात आला आहे.
३. अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती व सेतू अभ्यास :-
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व राज्य अभ्यासक्रम आराखड्यांच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठीचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे. संबंधित स्तराचे अंतिम पाठ्यसाहित्य निर्मितीसाठी बालभारतीस विहित वेळेत उपलब्ध करून देण्यात यावे.
नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम संबंधित सर्व इयत्तांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी तयार करावा व तो आवश्यक त्या सर्व वर्षांमध्ये वापरण्यात यावा,
४.पाठ्यपुस्तके व पाठ्यसाहित्य :-
राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ मधील तरतुदीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली पाठ्यपुस्तके, महाराष्ट्र राज्यासाठी आवश्यक असे सर्व बदल करून स्वीकारण्यात यावीत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत नमूद पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असणे, आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारसरणी वाढविण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे, अनुभवात्मक शिक्षण, इत्यादी बाबींचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक आहे.
तसेच मूल्यमापन, अध्यापन पद्धती, वेळापत्रक, निरीक्षण व सनियंत्रण, शिक्षकांचे प्रशिक्षण, इ. सर्वांगीण बाबींमध्ये आवश्यक त्या सुधारणा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे यांचेमार्फत निर्गमित करण्यात याव्यात.
बालभारतीची पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये वेळोवेळी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संबंधित विभाग प्रमुख व विषय तज्ञ यांचा सहभाग असावा. सदर पाठ्यपुस्तके ही निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तींची पूर्तता करणारी व अंमलबजावणीसाठी योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी करावी. त्यानंतर सदर अंतिम पाठ्यपुस्तकांना आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समन्वय समितीची मान्यता घ्यावी. राज्यस्तरीय समन्वय समितीचे मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करता येईल.
अंमलबजावणी वेळापत्रकानुसार, इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके आवश्यक सर्व माध्यमांत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे यांची राहील.
पाठ्यपुस्तकांना पूरक साहित्य, हस्तपुस्तिका, सेतू वर्ग साहित्य इ. निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत करण्यात यावी.
५. विषय योजना :-
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४ व राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ यामध्ये सुचविलेली विषययोजना अंमलबजावणी टप्प्यांनुसार राबविण्यात यावी. याबाबत अधिक स्पष्टतेसाठी आवश्यकतेनुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात,
६. मूल्यमापन :-
राष्ट्रीय शिक्षण धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखड्यांमधील तरतुदीनुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनविषयक मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी स्वतंत्ररित्या निर्गमित कराव्यात. त्यासाठी समग्र प्रगती पत्रकचा (Holistic Progress Card- HPC) आधार घ्यावा.
७.शालेय वेळापत्रक व तासिकांचे नियोजन :-
राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४ व राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ यामध्ये सुचविलेल्या दैनिक, साप्ताहिक, वार्षिक वेळापत्रकानुसार, इयत्तानिहाय, विषयनिहाय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या व कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी. सत्र निश्चितीचा कालावधी हा संचालक प्राथमिक/ माध्यमिक यांनी संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या सल्ल्याने निश्चित करावा. द्वितीय सत्र अखेरचे संकलित मूल्यमापन/वार्षिक परीक्षा या सत्रअखेरच घेण्यात याव्यात व त्यांचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार संचालक प्राथमिक / माध्यमिक यांनी संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करावे.
८. या शासन निर्णयामध्ये नमूद नसलेल्या इतर सर्व बाबी प्रचलित पद्धतीप्रमाणे चालू राहतील.
९ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०७१४१६१३३१७९२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सदर शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास कृपया ओळीला स्पर्श करा
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.९४/एस.डी.-४ मंत्रालय, मुंबई

