Guidelines for celebrating Classic Marathi Language Day And Week from 3rd To 9th October every year
Guidelines for celebrating Classic Marathi Language Day And Week from 3rd To 9th October every year
Guidelines for celebrating “Classic Marathi Language Day” on 3rd October and “Classic Marathi Language Week” from 3rd October to 9th October every year
दिनांक ०३ ऑक्टोबर हा दिवस “अभिजात मराठी भाषा दिवस” व दिनांक ०३ ऑक्टोबर ते दिनांक ०९ ऑक्टोबर हा कालावधी “अभिजात मराठी भाषा सप्ताह” प्रतिवर्षी साजरा करणेबाबत मार्गदर्शक सूचना.
दिनांक :- २१ जुलै, २०२५
परिपत्रक
वाचा – १. शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र. अभिजा २०२४/प्र.क्र.८६/भाषा-१, दि.१४.१०.२०२४
२. या विभागाचे समक्रमांकाचे दिनांक ०४.०७.२०२५ चे परिपत्रक.
विषयांकित प्रकरणी कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेषा परिपत्रकात अंतर्भूत करावयाची असल्याने मराठी भाषा विभागाचे संदर्भाधीन क्र.२ चे दिनांक ०४.०७.२०२५ चे परिपत्रक याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक ०३.१०.२०२४ रोजी झालेल्या बैठकीत मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला. त्यानुषंगाने उपरोक्त नमूद दिनांक १४.१०.२०२४ रोजीच्या शासन निर्णयास अनुसरुन अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावरुन सविस्तर मार्गदर्शक तत्वे आणि कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
२. या विभागाचे समक्रमांकाचे दिनांक ०४.०७.२०२५ चे परिपत्रक वाचा या ओळीला स्पर्श करून
मराठी भाषेला अभिजात दर्जा देताना मराठी भाषेची गेल्या सुमारे २५०० वर्षाची परपंरा गृहीत धरण्यात आली आहे. प्राचीन ग्रंथांची विविध लिपीतील भाषा, व्यवहारातील व विविध कला प्रकारातील भाषेच्या उपयोगाची गौरवशाली परपंरा विविध समाजघटकांसमोर येण्यासाठी मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, भाषेचे संवर्धन होण्यासाठी, जनमानसामध्ये मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख व्हावी, अभिजात मराठी भाषेसंदर्भातील संशोधन, जनजागृती जास्तीत जास्त व्हावी याकरिता प्रतिवर्षी दिनांक ३ ऑक्टोबर हा दिवस “अभिजात मराठी भाषा दिवस” व दिनांक ३ ते ९ ऑक्टोबर हा कालावधी “अभिजात मराठी भाषा सप्ताह” साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अभिजात मराठी भाषा दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये राज्य स्तरीय उपक्रम, बृहन्महाराष्ट्रस्तरीय उपक्रम आणि जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांची सर्वसाधारण रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे:-
राज्यस्तरीय उपक्रम :-
अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम थोडक्यात पुढील प्रमाणे असतील :-
दिनांक ३ ऑक्टोबर, २०२५ :
अभिजात भाषा संदर्भातील घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथे होईल. अभिजात मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून विविध ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
दिनांक ४ ऑक्टोबर, २०२५ :
“ऑनलाईन मराठी: दशा आणि दिशा” या विषयावर मुंबई येथे परिसंवाद. यामध्ये ह्या क्षेत्रात काम करणारे तज्ञ उद्योजक व अभ्यासकांचा समावेश असेल.
दिनांक ५ ऑक्टोबर, २०२५ :
“अभिजात मराठी भाषेबाबत महाराष्ट्र शासनाच्या भविष्यातील योजना” या विषयावर मुंबई येथे परिसंवाद.
या परिसंवादामध्ये पुढील मान्यवरांचा सहभाग असेल:-
१. मंत्री, मराठी भाषा विभाग
२. सचिव, मराठी भाषा विभाग
३. अध्यक्ष, मराठी भाषा समिती
४. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ
५. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ
वरील दोन्ही परिसंवादांचे प्रक्षेपण राज्य मराठी विकास संस्थेच्या You tube वाहिनीवर करण्यात येईल.
दिनांक ६ ते ८ ऑक्टोबर, २०२५ :
अमरावती येथे ११ भारतीय अभिजात भाषांच्या तज्ञ मंडळींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे आयोजन कुलगुरू, मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर, अमरावती यांच्याकडून करण्यात येणार आहे.
११ भारतीय अभिजात भाषा:-
तमिळ मल्याळम प्राकृत संस्कृत
ओडिशा आसामी कन्नड मराठी
बंगाली तेलुगु पाली
दिनांक ९ व १० ऑक्टोबर, २०२५ :
राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील किमान २ अशा सुमारे ७५० मराठी भाषा अधिकारी यांच्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दोन दिवसांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे आयोजन जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून करण्यात येणार आहे. ह्याबाबतचा सविस्तर तपशील आयोजक जिल्हाधिकारी यांचेकडून जाहीर करण्यात येईल.
या व्यतिरिक्त दिनांक ३ ते ९ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीमध्ये “राज्य मराठी विकास संस्था” या यूट्यूब चॅनेलवर पुढील विषयांवर त्या त्या विषयांमधील तज्ज्ञांसोबत ऑनलाईन पद्धतीने परिसंवादांचे आयोजन करण्यात येणार आहे.
३ ऑक्टोबर – आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळाला, त्याची एकूण प्रक्रिया कशी होती आणि अभिजात भाषा सप्ताहामागची भूमिका.
४ ऑक्टोबर – मराठी भाषेची उत्पत्ती आणि अभिजातता.
५ ऑक्टोबर – मराठी भाषेतील म्हणी, वाक्प्रचार आणि भाषेचे व्याकरण.
६ ऑक्टोबर – मराठी भाषेतील वृत्त आणि त्याचं सौंदर्य.
७ ऑक्टोबर – बोलीभाषा आणि प्रमाणभाषा.
८ ऑक्टोबर – मराठी ही अर्थार्जनाची भाषा.
९ ऑक्टोबर – नव्या पिढीची मराठी भाषा.
बृहन्महाराष्ट्रस्तरीय उपक्रम :-
महाराष्ट्राबाहेरील ६० बृहन्महाराष्ट्र मंडळे त्यांच्या स्तरावर अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये कार्यक्रम आयोजित करतील.
१७ देशांमध्ये उपसमन्वयक कार्यक्रम आयोजित करतील.
विविध बृहन्महाराष्ट्र मंडळे व आंतरराष्ट्रीय मंच यांच्याकडून अभिजात मराठी भाषा सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती संकलित करण्यात येईल.
जिल्हा, तालुका, ग्राम व नगरस्तरीय उपक्रम :-
१. राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील राज्यातील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी उद्योग, आस्थापना व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इ. सर्व संस्थामधून अभिजात मराठी भाषेसंदर्भातील जास्तीत जास्त संशोधन, संवर्धन व जनजागृती व्हावी या हेतूने प्रतिवर्षी दिनांक ०३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व दिनांक ०३ ऑक्टोबर ते दिनांक ०९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा.
२. अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये अभिजात मराठी भाषेसंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, शिबीरे आयोजित करण्यात यावीत.
३. अभिजात मराठी ग्रंथांची प्रदर्शने आयोजित करावीत. तसेच, ताम्रपट/शिलालेखांच्या प्रदर्शनांचे आयोजन करुन विद्यार्थी, सामान्य जनतेस मराठी भाषेतील अभिजात ग्रंथपरंपरेची ओळख करुन द्यावी.
४. अभिजात मराठी भाषेच्या अनुषंगाने प्राचीन ग्रंथ संपदेचे समकालीन मराठी मध्ये अनुवाद केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री करण्यात यावी.
५. शाळा/महाविद्यालयांमध्ये अभिजात मराठी ग्रंथ संपदेचे संगणकीकरण करुन त्याची विद्यार्थ्यांना तोंडओळख करुन द्यावी. तसेच, सदर ग्रंथांचे जतन व संवर्धन करण्याच्या पध्दतीचे चलचित्र सादरीकरण (स्लाईड शो) अथवा प्रात्यक्षिक आयोजित करण्यात यावे.
६. शाळा/महाविद्यालये तसेच, शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेसंदर्भात प्रश्नमंजुषेचे (Quiz), निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करावे.
मराठी भाषा गौरव दिन प्रश्न मंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून
७. याव्यतिरिक्त अभिजात मराठी भाषेच्या अनुषंगाने इतर नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात यावेत.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मराठी भाषा जिल्हा समितीचे प्रमुख या नात्याने प्रत्येक जिल्हयात ०३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व दिनांक ०३ ऑक्टोबर ते दि. ०९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हाभरात कार्यक्रमाचे नियोजन करावे. तसेच, सर्व मंत्रालयीन विभागाचे सचिव, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कार्यालयांना सदर परिपत्रक निर्दशनास आणावे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयात संपन्न झालेल्या विविध कार्यक्रमांबाबतचा जिल्हयाचा अहवाल दि.३१ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत श्री.अ.वा. गिते, नोडल अधिकारी तथा भाषा उपसंचालक (विधि), भाषा संचालनालय यांच्या
📧 👇
arun.gite@gov.in
या ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
दिनांक ०३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व दिनांक ०३ ऑक्टोबर ते दिनांक ०९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याकरिता येणारा खर्च प्रत्येक वित्तीय वर्षात त्या त्या संबंधित विभागाने / कार्यालयाने त्यांच्या कार्यालयीन खर्चासाठी मंजूर असलेल्या आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या
www.maharashtra.gov.in
या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक संकेतांक २०२५०७२१११२५३२५०३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(शिल्पा देशमुख)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग
शासन परिपत्रक क्रमांकः अभिजा २०२५/प्र.क्र.५३/भाषा-१,मुंबई