Effective Implementation Of Maharashtra Right To Public Services Act 2015 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागांच्या सर्व सेवा अधिसूचित करुन त्या पूर्णतः आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध

Effective Implementation Of Maharashtra Right To Public Services Act 2015

Effective Implementation Of Maharashtra Right To Public Services Act 2015

To make all services available online on Aaple Sarkar portal for effective implementation of Maharashtra Right to Public Services Act, 2015

Regarding notifying all the services of the departments for the effective implementation of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 and making them fully available online on the Aaple Sarkar portal.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागांच्या सर्व सेवा अधिसूचित करुन त्या पूर्णतः आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्र. GAD/५६/२०२५-GAD – Lokshahi Din,मंत्रालय, मुंबई

दिनांक: ०२ मे,२०२५

वाचाः महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ दिनांक २१ ऑगस्ट २०१५.

प्रस्तावनाः

राज्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ लागू झाला आहे. तथापि, सदर अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या बऱ्याच सेवा या नागरिकांना ऑफलाईन स्वरुपात देण्यात येतात, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. ऑफलाईन सेवा चालू असल्यामुळे नागरिकांना पारदर्शक पद्धतीने सेवा उपलब्ध होत नाहीत व कायद्याचा हेतू सफल होत नाही. शासकीय यंत्रणेमार्फत अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, समयोचित व कार्यक्षम पद्धतीने सेवा प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

            परिपत्रक

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांना खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-

१. विभागांच्या पोर्टलवरील ऑनलाईन सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करणेः महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ या अधिनियमांतर्गत आजमितीस एकूण १०२७ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एकूण १३८ सेवा सद्यस्थितीत विभागांच्या पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध आहेत, मात्र आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध नाहीत. अशा सर्व सेवा दि.३१.०५.२०२५ पूर्वी आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

२ . सद्यस्थितीत, ऑफलाईन उपलब्ध असलेल्या विभागांच्या सर्व सेवा आपले सरकार

पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करणेः महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्यात आलेल्या व सद्यस्थितीत ऑफलाईन उपलब्ध असलेल्या विभागांच्या ३०६ सेवा आपले सरकार पोर्टलवर दि.१५.०८.२०२५ पूर्वी उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

३. विभागांच्या उर्वरीत सर्व सेवा अधिसूचित करणे व ऑनलाईन उपलब्ध करणे:

क) सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या व त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालये, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, कंपन्या, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय संस्था, विद्यापीठे इ. च्या सर्व सेवा अधिसूचित करण्याची कार्यवाही १ महिन्यात पूर्ण करावी.

ख) अशा अधिसूचित केलेल्या सर्व सेवा दि. १५ सप्टेंबर, २०२५ पूर्वी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करुन द्याव्यात.

ग) राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, प्राधिकरणे यांचे सेवांसाठी एकच ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात यावी.

४. दंडात्मक कारवाई: जे विभाग वरीलप्रमाणे सेवा ऑनलाईन करण्यास अयशस्वी ठरतील त्यांना निर्धारीत कालमर्यादेनंतर संबंधित सेवांसाठी जबाबदार असणा-या विभाग प्रमुख /कार्यालय प्रमुख यांच्या वेतनातून प्रति सेवा प्रति दिन ₹१०००/-दंड आकारण्यात येईल. सदर दंडाची रक्कम महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम- २०१५ अन्वये दंड व शुल्क, मुख्य लेखाशीर्ष ००७०, इतर प्रशासनिक सेवा, ६०- इतर सेवा, गौण शीर्ष ११९- लोकसेवा कसूरीबाबत दंड, गट शीर्ष- (०१) महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम २०१५ अन्वये दंड व शुल्क (०१) दंड व शुल्क, योजनेचा सांकेतांक : ००७००८६९०१ येथे जमा करण्यात यावीः

५. उपरोक्त प्रमाणे सर्व संबंधित विभागांनी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने मुदतीत सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी. महा-आयटीने सर्व सेवा ऑनलाईन विकसित करण्यासाठी विभागांना कोणतेही शुल्क न आकारता मोफत सहाय्य उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी विभागांच्या सर्व सेवा ऑनलाईन पध्दतीने “आपले सरकार” पोर्टलवर उपलब्ध करून देण्याची व सर्व विभागांना ऑनलाईन सेवांचा डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महा-आयटीवर सोपविण्यात येत आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक या २०२५०५०२१२०९२०७९०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करू शकता

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

General Administration Department
Regarding notifying all the services of the departments and making them fully available online on the Aaple Sarkar portal for the effective implementation of the Maharashtra Right to Public Services Act, 2015.

Leave a Comment

error: Content is protected !!