Celebration of Marathi Language Conservation Fortnight
Celebration of Marathi Language Conservation Fortnight
Marathi Bhasha Sanvardhan Pandharwada
celebration of Marathi Language Conservation Fortnight from 14th January to 28th January, 2025.
Celebration of Marathi Language Conservation Fortnight from 14th January to 28th January, 2025.
दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: मभापं-२०२४/प्र.क्र.११७/भाषा-२
८ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक : ३१ डिसेंबर, २०२४.
वाचा :- मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. मभापं-२०१९/प्र.क्र.१११/भाषा-२, दि. १८.०९.२०२०
प्रस्तावना :-
राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे/महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/महाविद्यालये इत्यादी संस्थांमधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो.
“मराठी भाषेचा प्रचार व प्रसार” या विभागाच्या मुख्य धोरणास अनुसरुन “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात येतात. त्यानुसार यावर्षी देखील मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये आयोजित करण्यासाठी सर्व कार्यालयांना सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक :-
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सुयोग्य कार्यक्रम आयोजित करुन पंधरवडा समारंभपूर्वक साजरा करण्यासाठी सर्व कार्यालयांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-
अधिक जाणून घ्या भारतीय भाषा उपक्रम
अ) राज्यातील सर्व कार्यालयांनी करावयाचे कार्यक्रम :-
Marathi Bhasha Savrdhan Pandharwada QUIZ
मराठी भाषा संवर्धन प्रश्न मंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून
१) मराठी भाषेसंबंधी, वाङ्मयासंबंधी विविध परिसंवाद / व्याख्याने / कार्यशाळा / शिबीरे / कविसंमेलने/ एकांकिका/ बालनाट्ये / नाटके/ पुस्तक प्रकाशन समारंभ / साहित्य पुरस्कार वितरण यांचे आयोजन करणे.
२) मराठी भाषेत निबंध / प्रश्नमंजुषा / कथाकथन / चारोळीलेखन / कथालेखन / कवितालेखन/ हस्ताक्षर / शुद्धलेखन / वक्तृत्व / घोषवाक्ये / अभिवाचन / वादविवाद / अंताक्षरी/ शब्दकोडी / मराठी साहित्यासंबंधी पुस्तकांचे रसग्रहण / समीक्षण / परिच्छेद अनुवाद इत्यादी स्पर्धा घेणे.
३) मराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांचा परिचय करुन देण्यासाठी मराठी भाषेतील तज्ज्ञ नामवंत व्यक्ती / लेखक / वक्ते यांच्याकडून मार्गदर्शन, परिसंवाद, कार्यशाळा यांचे आयोजन करणे.
४) ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदिंडी, कथाकथन, काव्यवाचन, माहितीपट इत्यादी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम करणे.
५) वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असणाऱ्या मराठी भाषक व्यक्तींचा सत्कार, मुलाखती घेणे.
६) राज्यातील अमराठी भाषकांना मराठी भाषेचा सुलभ पध्दतीने परिचय करुन देण्याच्या दृष्टीने कार्यशाळा/ भाषेसंबंधी स्पर्धांचे आयोजन करणे.
७) मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता संबंधित कार्यालयांनी संकेतस्थळे, आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी दूरचित्रवाहिन्या, एफ.एम. रेडिओ, स्थानिक केबल नेटवर्क, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप इ. अशा आधुनिक प्रसार माध्यमातून याबाबतचे दृक-श्राव्य संदेश प्रसारित करावेत.
८) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व विकास यासाठी विविध मार्गानी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या व्यक्ती / संस्था यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव / सत्कार करणे.
९) टंकलेखनाकरिता युनिकोड मराठीचा जास्तीतजास्त वापर करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे.
१०) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार या उद्दिष्टांसह रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी खालील विषयावरील तसेच अशा स्वरुपाच्या अन्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
१. अनुवादलेखन
२. व्यावसायिक लेखन
३. पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया
४. स्व-प्रकाशन
५. ई-बुक
६. ऑनलाईन पुस्तक विक्री
७. लेखक प्रकाशन करार
८. संहिता लेखन
९. विकिपिडिया कार्यशाळा
१०. शॉर्ट फिल्म/डॉक्युमेंटरी लेखन
११) डिजिटल साहित्य संमेलनाचे आयोजन करणे, तसेच मराठी वाचन संस्कृती जपण्यासाठी सर्वांनी मराठीतील साहित्य स्वयंस्फुर्तीने वाचणे, तसेच पुस्तके विकत घेणे, इतरांना भेट देणे इत्यादी उपक्रम राबवावेत.
१२) प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाची जत्रा आयोजित करण्यात यावी. या जत्रेत लोक आपली पुस्तके निःशुल्क किंवा स्वस्त दरामध्ये इतरांना देऊ शकतील. तसेच, या जत्रेदरम्यान मराठीच्या प्रचार व प्रसारासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.
१३) महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ नुसार वर्जित प्रयोजने वगळता शासकीय कामकाज १००% मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. तर, त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये/सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा मराठी भाषा समितीमार्फत विविध उपक्रम राबवावेत तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, नियम, अधिनियम संबंधितांच्या निदर्शनास आणावेत.
१४) सर्व संस्थांनी समाज माध्यमांवर “मराठी वाचन कट्टा” निर्मिती करावी.
१५) सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी प्रचार, प्रसार व विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे.
१६) अभिजात मराठी भाषेबाबत सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या समन्वयाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे.
ब) राज्यस्तरावर साहित्य संस्थांच्या मदतीने वरील “अ” प्रमाणे करावयाची कार्यवाही :-
राज्यस्तरावर वरील कार्यक्रम सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व राज्य मराठी विकास संस्था यांनी खालीलप्रमाणे साहित्य संस्थांची मदत घेऊन त्या साहित्य संस्थांसमोर दर्शविलेल्या जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करावेत.
अ.क्र.
१ साहित्य संस्था
साहित्य संस्थेच्या अंतर्गत जिल्हे
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर
२ मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर.
३ विदर्भ साहित्य संघ, नागपूर
बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोली
४ कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी
रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर
५ दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर
कोल्हापूर
६ मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई.
मुंबई शहर
क) आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय महाराष्ट्र मंडळांनी देखील या कालावधीत अनुक्रमे परदेशात व इतर राज्यात उपरोक्त “अ” मध्ये नमूद केल्यापैकी कार्यक्रम आयोजित करावेत.
ड) भाषा संचालनालयाने व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजकाबद्दल (मोबाईल अॅप) तसेच मराठी भाषा विभागाच्या व त्या अंतर्गत कार्यालयांच्या संकेतस्थळांबद्दलची माहिती भाषा पंधरवड्याच्या निमिताने शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत प्रसारीत करण्याची जबाबदारी चारही क्षेत्रीय कार्यालयांची राहील.
आ) सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी “मराठी भाषा प्रचार व प्रसाराचे उपक्रम (कार्यक्रम)” महसूली विभाग व जिल्हास्तरावर राबविण्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबतचा शासन निर्णय क्र. मभावा-२०२०/प्र.क्र.९८/भाषा-२, दि.२४.०६.२०२२ मधील परिच्छेद २ मध्ये नमूद केल्यानुसार कार्यवाही करावी. सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी भाषा संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई तसेच परिच्छेद “ब” येथे दर्शविलेल्या साहित्य संस्थांची मदत घेता येईल.
२. राज्यात तसेच जिल्हा स्तरावर त्यांच्या अखत्यारित असलेल्या कार्यक्षेत्रात वर दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आयोजन खालील कार्यालयांनी करावे.
अ) मुंबई (मुख्यालय स्तरावर)- सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील मुंबईतील शासकीय कार्यालये
आ) सर्व विभागीय आयुक्तांची कार्यालये
इ) सर्व जिल्हाधिकारी कार्यालये तसेच विविध विभागांच्या अधिपत्याखालील जिल्हास्तरीय कार्यालये
ई) मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) तालुकास्तरावर, ग्रामीणस्तरावर
उ) शासनाच्या अखत्यारितील कार्यालये/मंडळे/महामंडळे/सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था
ऊ) शिक्षण संचालक/सर्व विभागीय सह संचालक / उप संचालक / जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक/ प्रौढ शिक्षण व अल्पसंख्यांक) कार्यालये व त्यांच्या अधिनस्त कार्यालये
ए) सर्व संचालक (उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, व्यवसाय विभाग, ग्रंथालये) कार्यालये व त्यांच्या अधिनस्त कार्यालये
ऐ) महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये व आस्थापना आणि महाराष्ट्र राज्यातील जनतेला बँकींग, दूरध्वनी, टपाल, विमा, रेल्वे, मेट्रो, मोनोरेल, विमान प्रवास, गॅस, पेट्रोलियम, कराधान, पारपत्र इत्यादी सेवा पुरविणारी अन्य कार्यालये.
३. या कार्यक्रमांकरीता येणारा खर्च प्रत्येक वित्तीय वर्षात त्या त्या संबंधित विभागाने/कार्यालयाने त्यांच्या कार्यालयीन खर्चासाठी मंजूर होणाऱ्या आर्थिक तरतूदीतून अदा करावा.
४. सर्व कार्यालयांनी वरीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करुन या विभागास कार्यक्रमांबाबतचा अहवाल सादर करावा.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१२३११३१०११०७३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन निर्णय पिडीएफ उपलब्ध या ओळीला स्पर्श करा
(वैशाली वाघमारे)
कार्यासन अधिकारी,
महाराष्ट्र शासन