STARS PROJECT PAT 2024 25 Class Medium Curriculum Schedule Subject Implementation SCERT Guidelines CIRCULAR
STARS PROJECT PAT 2024 25 Class Medium Curriculum Schedule Subject Implementation SCERT Guidelines CIRCULAR
विषय : STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४ -२५ आयोजनाबाबत….
संदर्भ :
१. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching-Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.
२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching – Learning And Results for States) केंद्र पुरस्कृत प्रकल्प राज्य अनुदान वितरण वित्तीय नियमावली मार्गदर्शक तत्वे.
३. STAR प्रकल्प अतर्गत मंजूर PAB मिटिंगचे इतिवृत्त, दि. ३१ मार्च २०२४
उपरोक्त विषयान्वये या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी -२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलभूत सुधारणा करणे व कृती-कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
- पायाभूत चाचणी उद्देश/उपयोग/फायदे :-
१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.
२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल.
३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल.
४) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.
५) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होईल.
- पायाभूत चाचण्यांचे माध्यम व विषय :
सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
- चाचणीचा अभ्यासक्रम :
मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.
शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
- पायाभूत चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :
१. पायाभूत चाचणी ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.
२. पायाभूत चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.
३. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.
४. पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य.) यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येत आहेत.
५. तालुकास्तरावर पोहचविण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त प्रश्नपत्रिका ठेवाव्यात. तसेच प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.
६. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर थेट शाळास्तरावर पोहचवाव्यात.
७. प्रश्नपत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.
अ. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयकांनी यांनी इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच पोहोच द्यावी.
आ. तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या
ताब्यात द्यावयाच्या आहेत. तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही प्रश्नपत्रिका
अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
इ. शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.
८. प्रश्नपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. प्रश्नपत्रिकांची गोपनियता काटेकोरपणे पाळण्यात यावी.
९. तालुका स्तरावर प्रश्नपत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.
१०. जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची चाचणी आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल.
११. शिक्षणाधिकारी यांचेकडून दि.११ जून २०२४ पर्यंत प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे प्रश्नपत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका कमी पडल्यास अथवा XEROX काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) / शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांची असेल याची नोंद घ्यावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांची वैयक्तिकरित्या राहील.
१२. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.
१३. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
१४. प्रस्तुत पायाभूत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac in या वेबसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असेल उत्तरसूची परीक्षेदिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात.
१५. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये. विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्रिका देण्यात याव्यात.
१६. पायाभूत चाचणीची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात भरावी.१७. पायाभूत चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.
- चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत –
१) जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.
२) जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचे नियोजन करावे.
३) चाचणी कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.
४) तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची रॅडमली तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.
उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करायचे असल्यास संबधित शिक्षणाधिकारी यांनी वेळापत्रकात बदल करावा व तसे या कार्यालयास अवगत करावे.
वरीलप्रमाणे आपल्या अधिनस्त शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांचेपर्यंत पायाभूत चाचणीच्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात.
पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.
सदर परिपत्रक पीडीएफमध्ये हेवे असल्यास या ओळीला स्पर्श करा
(राहुल रेखाकार भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
सदर परिपत्रक पीडीएफमध्ये हेवे असल्यास या ओळीला स्पर्श करा
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे
STARS प्रकल्प अंतर्गत संकलित मूल्यमापन – १ : २०२४-२५
वर्ग ३ रा विषय : मराठी गणित इंग्रजी
गुणनोंद प्रपत्रे पीडीएफ