Geo Tagging of all schools
Geo Tagging of all schools
Regarding Geo Tagging of all schools in the state
राज्यातील सर्व शाळांचे Geo Tagging करण्याबाबत.
दिनांक :- २३ एप्रिल, २०२५
संदर्भ :-
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर यांचा
दि. ०४.०२.२०२५ रोजीचा करारनामा
प्रस्तावना :-
राज्यातील सर्व शाळांबाबतची विस्तृत माहिती केंद्र शासनाच्या UDISE plus या पोर्टलवर उपलब्ध असून यामध्ये शाळांबाबतची विविध माहिती जसे विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या, शाळांमध्ये उपलब्ध भौतिक सुविधा, संगणकीय सुविधा इ. माहिती या पोर्टलवर उपलब्ध असून या माहितीचा वापर शासन स्तरावर विविध धोरण/कार्यक्रमांची आखणी तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार करताना होत असतो. तथापि, धोरणांच्या आखणीकरीता व अंमलबजावणीकरीता अन्य माहिती जसे गांव, वाडया, वस्ती यांचे ठिकाण (Location), लोकसंख्येची घनता तसेच उपलब्ध जिल्हा, राज्यमार्ग/महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, दोन शाळांमधील अंतर, शाळांच्या नजिक शासनाच्या इतर विभागांद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती विभागाकडे सद्यःस्थितीत उपलब्ध नव्हती.
२. ही कमतरता भरुन काढण्याकरीता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर (MRSAC) या संस्थेसोबत दि.०४.०२.२०२५ रोजी करारनामा करण्यात आला आहे. त्यामुळे MRSAC कडे उपलब्ध विविध विभागांची माहिती व UDISE plus या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागांची माहिती यांचे एकत्रिकरण करुन सदरहू माहिती एका स्वतंत्र Dash Board वर उपलब्ध करण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागास संबंधित विविध योजनांच्या आखणीकरीता व अंमलबजावणीकरीता होणार आहे. त्या अनुषंगाने सदर करारनामा करण्यात आला आहे.
३. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर या संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करुन भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे (geospatial technology) सर्व माहिती एकत्रित करण्याकरीता Mobile App: “Maha School GIS” अॅप विकसित करण्यात आले आहे. सदर अॅपचे लोकार्पण मा. मंत्रीमंडळाच्या दि.२२.४.२०२५ रोजीच्या बैठकीमध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानुसार संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापक यांनी यासंदर्भात करावयाच्या पुढील कार्यवाहीबाबत सुचना निर्गमित करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करुन भौगोलिक तंत्रज्ञानाव्दारे (geospatial technology) सर्व माहिती एकत्रित करण्याकरीता Mobile App: “Maha School GIS” अॅप विकसित केले आहे.
२. सदर अॅप मध्ये शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडयस प्लस मधील संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावयाचे आहे. त्यानंतर शाळेची युडयस प्लस मध्ये भरलेली माहिती या अॅपमध्ये दिसेल. त्यानंतर शाळेचे GIS Location (Latitude & Longitude with time stamp) Capture करुन शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण ५ फोटो समाविष्ट करुन शाळेने माहिती भरावयाची आहे.
३. सदर माहिती संबंधीत अॅप वर भरतांना संबंधीत मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो / माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घेण्यात यावी.
४. सदर माहिती संबंधीत अॅपवर दि. ३० एप्रिल, २०२५ पुर्वी अद्ययावत करण्यात यावी.
५. सर्व शाळांकडून ही माहिती भरून घेण्यात येत असल्याची खातरजमा संबंधीत शिक्षणाधिकारी यांनी करावी.
६. विहीत मुदतीत ही कार्यवाही पूर्ण होण्याच्या अनुषंगाने आवश्यक प्रशासकीय सूचना आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी निर्गमित कराव्यात.
७. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०४२३११५१००१०२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन निर्णय /शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
उप सचिव महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभागशासन परिपत्रक क्रमांक: ईगव्ह-२०२५/प्र.क्र.७/संगणक, मंत्रालय, मुंबई