Vetan Sanrakshan Paripatrak
Vetan Sanrakshan Paripatrak
asaman padavar navin niyukti milalelya shikshakanna vetan sanrakshan denyababat
Regarding the provision of pay protection to teachers newly appointed to a different-level post
महाराष्ट्र शासन
शिक्षण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे
क्र. आस्था/प्राथ./१०६/पवित्र/२०२२ / 12034
दि. १० /०३/२०२२
प्रति,
कक्ष अधिकारी
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, (टीएनटी-३) मंत्रालय, मुंबई-३२
विषय :- असमान पदावर नवीन नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांना वेतन संरक्षण देण्याबाबत.
संदर्भ :- १. या कार्यालयाचे समक्रमांकाचे पत्र क्रमांक २७८८ दिनांक ७/१०/२०२०.
२. शासन पत्र क्रमांक वेतन-१२२१/प्रक्र १०/२१/टीएनटी-३ दिनांक २८/०९/२०२१.
महोदय,
वरील संदर्भीय शासन पत्राच्या अनुषगांने उपस्थित केलेल्या मुद्यांवर या कार्यालयाचे अभिप्राय खालील प्रमाणे सादर करण्यात येत आहेत.
१. शासकीय कर्मचाऱ्यांनी उच्च अर्हता प्राप्त केल्यानंतर म.ना.से. (वेतन) नियम, १९८१ मधील तरतूदी विचारात घेवून शासन निर्णय दिनांक २३/०३/१९९४ मधील कार्यपध्दतीचा अवलंब केलेल्या प्रकरणी वेतन संरक्षण देण्यात येते. खाजगी शाळांतील शिक्षकांना सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक २३/०३/१९९४ लागू करण्यात आलेला नाही. शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण सेवक योजनेच्या विविध शासन निर्णयान्वये शिक्षकांच्या मानधनाबाबत वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत.
नैसर्गिक न्यायत्तत्त्वानुसार एखाद्या शिक्षकाने त्याच्या अहंतेत वाढ केल्यास आणि स्पर्धात्मक निवड प्रक्रियेतून नव्याने उच्च पदावर निवड होवून नियुक्ती स्वीकारल्यास त्याच्या वेतनास संरक्षण देणे योग्य राहील. यामुळे शासनावर वेगळा कोणताही आर्थिक भार येणार नाही, कारण सदर शिक्षकांने उच्च अर्हता प्राप्त करुन नवीन नोकरी स्वीकारली नसती तर सदर शिक्षक त्याच्या सध्याच्या वेतनासह कार्यरत राहिला असता तरी त्यास सध्याचे वेतन व अन्य लाभास पात्र असल्यास सदर लाभ देखील द्यावे लागले असते.
२. स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी शैक्षणिक संस्थेतील शिक्षक वा शिक्षकेत्तर कर्मचारी याने सेवेत असताना विहित कार्यपद्धतीचा अवलंब करुन त्याची निवड होऊन नियुक्ती स्वीकारली असेल तर अशा प्रकरणी त्याच्या पूर्वीच्या पदावर देय असलेले लाभ देणे योग्य राहील.
३. एका व्यवस्थापनाकडून अन्य व्यवस्थापनाकडील उच्च वेतनश्रेणीतील नवीन पदावर रुजू झाल्यामुळे अशा कर्मचा-यास उच्च वेतनश्रेणीतील नवीन पदावरील सेवाशर्ती लागू होतात. त्यामुळे पूर्वीच्या पदावरील सेवा ग्राह्य धरुन सेवाजेष्ठता, वरिष्ठ, निवड श्रेणी इत्यादीचे लाभ लागू होणार नाहीत. सदर पदावरील सेवाजेष्ठता नव्याने लागू होईल.
४. तथापि, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील अनुसूची ‘फ’ नुसार एकाच प्रवर्गातर्गत नव्याने निवड होऊन उच्चवेतनश्रेणीतील त्याच मूळ व्यवस्थापनात नियुक्ती स्वीकारलेल्या पदावरील कर्मचा-यास पूर्वीच्या पदावरील सेवाजेष्ठता लागू राहील.
उदा. एखाद्या व्यवस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या बी.ए.बी.एड. अर्हताधारक शिक्षकाने उच्च अर्हता प्राप्त करुन त्याच व्यवस्थापनामध्ये नवीन पदावर नियुक्ती स्वीकारल्यास अनुसूची ‘फ’ नुसार सदर शिक्षक प्रवर्ग ‘क’ मध्येच राहात असल्याने त्याची मूळ पदावरील सेवाजेष्ठता कायम राहील.
५. समान वेतनश्रेणीतील नवीन पदावर निवड होऊन नियुक्ती स्वीकारलेल्या कर्मचा-यास पूर्वीच्या पदावरील सेवाजेष्ठता लागू होणार नाही. तथापि पूर्वीच्या पदावरील सेवा ग्राह्य धरुन वरिष्ठ श्रेणी, निवडश्रेणीचे लाभ लागू होतील.
६. शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची नामनिर्देशनाने दुसऱ्या पदावर नेमणूक झाल्यास नवीन पदावर नियुक्तीवरील वेतन निश्चिती करताना पूर्वीच्या वेतनास संरक्षण द्यावयाचे झाल्यास संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी खालील अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील.
अ) संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी संबंधित पदासाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांची विहीत कार्यपद्धतीने पूर्व परवानगी घेवून अर्ज केलेला असावा.
ब) पूर्वीचे पदावरील कायम कर्मचा-यास वेतन संरक्षण अनुज्ञेय असेल. परिविक्षाधीन कालावधीतील नवीन नियुक्तीस वेतन संरक्षण लागू होणार नाही.
क) पूर्वीची सेवा व नवीन नियुक्ती यामध्ये खंड नसावा.
ड) विहित पद्धतीने पूर्वपरवानगी न घेता नवीन पदावर रुजू झाल्यास वेतनास संरक्षण मिळणार नाही. तथापि शिक्षक पदाच्या नियमित वेतनश्रेणीत कार्यरत असलेल्या कायम शिक्षकांना नवीन पदावर रुजू झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू न करता वेतनश्रेणीच्या किमान टप्प्यावर वेतन निश्चित करण्यात यावे.
नैसर्गिक न्यायतत्त्वाचा विचार करता, शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी अर्हता वाढ करुन त्यांची नामनिर्देशनाने नवीन पदावर निवड होवून रुजू झाल्यास त्यांना वरील अटी व शर्ती विचारात घेवून वेतनास संरक्षण देणे योग्य राहील असे अभिप्राय शासनास सादर करण्यात येत आहेत.
आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे
