Re Examination For Students
Re Examination For Students
इयत्ता ९ वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे आयोजन
करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः शैगुवा-२०१७/(४६/१७)/एसडी-६ मंत्रालय, मुंबई
दिनांक : २७ एप्रिल, २०१७
वाचा –
१) शासन निर्णय क्रमांकः शैगुवि २०१६/(२९/२०१६)/एसडी-६, दिनांक :- १६ सप्टेंबर, २०१६.
२) शासन निर्णय क्रमांकः शैगुवा-२०१६/(१८४/१६)/एसडी-६, दिनांक:- ३१ डिसेंबर, २०१६.
प्रस्तावना –
माध्यमिक स्तरावर शासन निर्णय दिनांक १६ सप्टेंबर, २०१६ व दिनांक ३१ डिसेंबर, २०१६ अन्वये अनुक्रमे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर व जलद गतीने शिक्षणाद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती कमी करणे याबाबतचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शासन निर्णय दिनांक १६ सप्टेंबर, २०१६ रोजी निर्गमीत करण्यात आलेल्या महत्वाच्या तरतूदी पुढीलप्रमाणे आहेत.
१. (६.४.१) इयत्ता ९ वी मधील अनुत्तीर्ण होणा-या मुलांना पुनर्परीक्षेची संधी :
“इयत्ता १० वी मध्ये अनुत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे पुनर्परीक्षेची संधी दिली जाते त्याचप्रमाणे इयत्ता ९ वी मध्ये अनुत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांला देखील पुनर्परीक्षेची संधी दिली जाईल. जून च्या पहिल्या आठवडयात ही पुनर्परीक्षा शाळा स्तरावर होईल.”
वरील तरतूदी नुसार इयत्ता ९ वी मध्ये अनुत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा कधी घेण्यात यावी, या संदर्भातील प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या अनुषंगाने शासन स्तरावरुन पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
शासन निर्णय :
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिक स्तर याबाबतचा शासन निर्णय शैक्षणिक वर्षामध्ये माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये निर्गमित झाला असल्यामुळे सन २०१६-१७ मध्ये नैदानिक चाचण्याचे आयोजन करता येणे शक्य झाले नाही. तथापि शैक्षणिक वर्ष सन २०१७-१८ पासून इ.९वी व इ.१०वी मधील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येतील. तसेच नैदानिक चाचण्यांच्या निकालावरुन ज्या विद्यार्थ्यांना इ.९वी व इ.१०वी मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता अडचणी येऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांसाठी जलद गतीने शिक्षण पध्दतीचा अवलंब करुन या सर्व विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे उत्तीर्ण होण्याकरिता आवश्यक ते सर्व सहाय्य पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांकडून करण्यात यावेत. याकरिता आवश्यक प्रशिक्षणाचे आयोजन राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राज्य मंडळ व विद्या प्राधिकरणामार्फत करण्यात येईल. नैदानिक चाचण्या विद्या प्राधिकरणामार्फत तयार करण्यात येतील, व या चाचण्या शाळांमधून घेण्याची जबाबदारी राज्य मंडळाची राहील.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये सर्व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ९वी मधील गरजू विद्यार्थ्यांना जलद गतीने शिक्षणाच्या पध्दती अंमलात आणल्यावर देखील जर काही विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असतील तर अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी उपलब्ध करुन दिली जाईल. सन २०१७-१८ या वर्षाकरिता पुनर्परीक्षा जून-२०१८ मध्ये होईल. पुनर्परीक्षेकरिता मूल्यमापन पध्दती इयत्ता ९वी करिता असलेल्या सरासरी पध्दती प्रमाणेच राहील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१७०४२७१५०३२०४५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,
🌐👉 सदर शासन निर्णय पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈
प्रधान सचिव महाराष्ट्र शासन
अधिक जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👇