Pension Grievance Redressal Module
Pension Grievance Redressal Module
Regarding making available the facility of online Pension Grievance Redressal Module in the Pension Channel system for pensioners or family pensioners receiving pension and family pension through the District Treasury Offices of the State and the Pay and Accounts Office, Mumbai.
राज्यातील जिल्हा कोषागार कार्यालये आणि अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांचेमार्फत निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचेसाठी ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युल (Pension Grievance Redressal Module) ही सुविधा निवृत्तीवेतनवाहिनी या प्रणालीमध्ये उपलब्ध करून देणेबाबत.
दिनांक : २९.१०.२०२५
प्रस्तावना :
अ) महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये आणि अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथून निवृत्तीवेतन घेणाऱ्या एकूण निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांची संख्या लक्षणीय आहे. ई-शासन आणि सुशासन संकल्पनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून निवृत्तीवेतन प्रदानाच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करण्यात आलेले आहे. तथापि, काही प्रकरणी निवृत्तीवेतन प्रदानाच्या अनुषंगाने अडचणी किंवा तक्रारी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी संबंधित निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट द्यावी लागते अथवा अर्ज सादर करावे लागतात. निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे निवारण किंवा अडचणींचे निराकरण वेगवेगळ्या पातळ्यांवर होत असले तरी, सद्यस्थितीत तक्रार निवारण कार्यतंत्र व कार्यपद्धत औपचारिक स्वरूपात उपलब्ध नाही. त्यामुळे तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये अपेक्षित पारदर्शकता दिसून येत नाही. परिणामी अर्जदाराला किंवा तक्रारदाराला अर्जाच्या किंवा तक्रारीच्या निवारणाच्या प्रगतीची माहिती सहजतेने मिळण्यामध्ये अडचणी येतात.
आ) या बाबी लक्षात घेता अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये यांचेमार्फत निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना ऑनलाईन पद्धतीने तक्रार अर्ज दाखल करता यावेत; तसेच यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय यांना अशा तक्रारींचे निवारण ऑनलाईन पद्धतीनेच करता यावे; यासाठी निवृत्तीवेतनवाहिनी या प्रणालीमध्ये ऑनलाईन ‘निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युल’ (Pension Grievance Redressal Module) ही सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
३) ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युलच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्याचे प्रशासकीय व
तांत्रिक दृष्टीकोनातून योग्य कार्यान्वयन आणि व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया; अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व जिल्हा कोषागार कार्यालये यांचेकडून तक्रारींचे ऑनलाईन पद्धतीने निवारण करण्याची प्रक्रिया; आणि प्रादेशिक सह संचालक, लेखा व कोषागारे, कार्यालयांकडून तक्रार निवारण प्रक्रियेचे पर्यवेक्षण आणि संनियंत्रण करण्याची प्रक्रियाः इत्यादी संदर्भात अनुसरावयाची कार्यपध्दती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
१. उक्त प्रस्तावनेत नमूद वस्तूस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये आणि अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांचेमार्फत निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचेसाठी निवृत्तीवेतनवाहिनी या प्रणालीमध्ये ऑनलाईन निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युल दि.१ नोव्हेंबर, २०२५ पासून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. निवृत्तीवेतनवाहिनी ही प्रणाली पूर्णतः संगणकीकृत असून सदर प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युलचे कामकाज देखील पूर्णतः ऑनलाईन पद्धतीचेच असणार आहे. निवृत्तीवेतन प्रदानाच्या अनुषंगाने संबंधित अर्जदार /निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक निवृत्तीवेतन प्रदानाच्या अनुषंगाने त्यांची तक्रार
https://pension.mahakosh.gov.in/login.jsp
या संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने दाखल करू शकतील.
३. निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करण्यासाठी अर्जदार किंवा निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी अनुसरावयाची कार्यपध्दती या शासन निर्णयासोबतच्या ‘सहपत्र अ’ अन्वये विहित करण्यात येत आहे.
४. अर्जदार किंवा निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय यांचे स्तरावर संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी अनुसरावयाची कार्यपध्दती या शासन निर्णयासोबतच्या ‘सहपत्र ब’ अन्वये विहित करण्यात येत आहे.
५. अर्जदार किंवा निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई किंवा प्रादेशिक सह संचालक, लेखा व कोषागारे यांचे स्तरावर अनुसरावयाची कार्यपध्दती या शासन निर्णयासोबतच्या ‘सहपत्र क’ अन्वये विहित करण्यात येत आहे.
६. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी यांनी त्यांचे जिल्हा मुख्यालय त्याचप्रमाणे तालुका स्तरावरील कार्यालये येथे तसेच अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई यांनी मुंबई येथील शासकीय कार्यालयांमध्ये निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युलबाबत व्यापक प्रसिध्दी द्यावी. तसेच निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या संघटनांना सदर सुविधेबाबत अवगत करावे.
७. अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांतील सर्व संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना सदर प्रणाली संदर्भात आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची तसेच वेळोवेळी लागणारे तांत्रिक मार्गदर्शन करण्याची कार्यवाही संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांचेकडून करण्यात येईल.
८. राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये आणि अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई येथे निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने दाखल झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तक्रार निवारण कामकाजाचा आढावा संचालक, संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी घेण्यात येईल.
९. निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युलच्या अनुषंगाने निवृत्तीवेतनवाहिनी या प्रणालीमध्ये वेळोवेळी लागणाऱ्या अपडेट्स / वृध्दी, प्रणालीची देखभाल, आवश्यक पायाभूत सुविधा, इत्यादींबाबत आवश्यक ते विकसन करण्यासाठी संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
१०. याबाबत विस्तृत माहितीपत्रक PPT स्वरूपात निवृत्तीवेतनवाहिनी या प्रणालीवर
https://pension.mahakosh.gov.in/login.jsp
येथे User Manual >> Pension >> User Manual >> Pension Grievance Redressal Module येथे उपलब्ध आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५१०२९१५०७४९६३०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासनाचे उप सचिव
महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२५/प्र.क्र.७७/कोषा. प्रशा. – ५. मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

सहपत्र - 'अ'
निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉड्युलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करण्यासाठी अर्जदार / निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी अनुसरावयाची कार्यपध्दती
१) ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविण्यासाठी अर्जदार / निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी निवृत्तीवेतनवाहिनीमध्ये https://pension.mahakosh.gov.in/login.jsp या संकेतस्थळाचा वापर करून Login Id : PENSIONER आणि Password: ifms123 वापरून Login करणे आवश्यक राहील.
२) Login झाल्यानंतर आवश्यक तपशील भरून Submit बटणावर Click करावे. तद्नंतर पुढील पृष्ठावर मोबाईल क्रमांक नमूद करून, Generate OTP पर्यायाचा वापर करून, मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला चार अंकी OTP नमूद करावा.
३) तक्रारीचे जलद आणि प्रभावीपणे निराकरण होण्यासाठी अर्जदार / निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी Grievances Registration मध्ये तक्रारीचे स्वरुप / तक्रारीचा विषय या संदर्भात योग्य पर्याय निवडणे आवश्यक राहील. तसेच तक्रारीचे संक्षिप्त वर्णन नमूद करणे आवश्यक राहील. तक्रारीच्या पृष्ठ्यर्थ जोडपत्र जोडावयाचे असल्यास, ते जोडण्याची सुविधा देखील या प्रणालीमध्ये उपलब्ध असणार आहे.
