Administrative Approval For Online Teacher Recruitment Through Pavitra Portal
Administrative Approval For Online Teacher Recruitment Through Pavitra Portal
Administrative approval for online teacher recruitment through Pavitra portal
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता.
दिनांकः ३० जानेवारी, २०२६.
वाचा :
१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समक्रमांक दि.१४.०१.२०२५.
२. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आशिका/२०२५/पवित्र/ईगव्ह. १४३/१४३५०३८/२०२५, दि.१८.०९.२०२५.
३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे अधिनस्थ प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या दिनांक १७.१०.२०२५ रोजी संपन्न झालेल्या बैठकीचे इतिवृत्त.
प्रस्तावना :
संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी – सन २०२२ या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचे कामकाज Talisma Corporation Pvt. Ltd. या संस्थेमार्फत हाताळण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. या परीक्षेच्या आधारे शिक्षक पदभरतीच्या पहिल्या व दूसऱ्या टप्प्यातील कामकाजासाठी अनुक्रमे रुपये ७४,३३,५००/- व रुपये ६८,८४,१२०/- इतक्या खर्चास देखील सदर शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी – सन २०२५ या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचे पुढील कामकाज हाताळण्यासाठी Talisma Corporation Pvt. Ltd. या संस्थेस किमान १ वर्ष किंवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीचा किमान टप्पा यापैकी जे नंतर घडेल, त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबतचा व यासाठीचा एकूण खर्च रुपये ६८,८४,१२०/-(जीएसटीसह) यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी- सन २०२५ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, रिक्त पदे भरण्याची तातडी आहे, सदर कामकाज संवेदनशील व अचूकपणे हाताळण्यासाठी नवीन एजन्सीला काहीसा अधिक कालावधी लागू शकतो, Talisma Corporation Pvt. Ltd. या संस्थेच्या अचूक व गोपनिय कामाचा आलेला अनुभव, कामकाजाच्या दरात कोणतीही वाढ न करणे, मूळ RFP मधील अट क्र.५.१३ अन्वये कंपनीचे कामकाज समाधानकारक वाटल्यास एकावेळी १ वर्षाची मुदतवाढ देण्याची असलेली तरतूद इत्यादी बाबी प्रस्तावाच्या समर्थनार्थ सदर पत्रान्वये निदर्शनास आणण्यात आल्या आहेत. याबाबी विचारात घेऊन प्रकल्प अंमलबजावणी समितीने संदर्भ क्र.३ अन्वये सदर प्रस्तावास सहमती दर्शविली आहे. त्याचप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचे ऑनलाइन कामकाज हाताळण्यासाठी १ वर्ष कालावधीकरीता नव्याने निविदा प्रसिध्द करण्यास व त्यासाठीचा वार्षिक अंदाजे खर्च रुपये ७४,३४,८४९/- इतक्या खर्चास देखील प्रकल्प अंमलबजावणी समितीने मान्यता दिलेली आहे. प्रकल्प अंमलबजावणी समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी सन २०२५ या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीचे पुढील कामकाज हाताळण्यासाठी Talisma Corporation Pvt. Ltd. या संस्थेस किमान १ वर्ष किंवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीचा किमान टप्पा यापैकी जे नंतर घडेल, त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास व यासाठीचा एकूण खर्च रुपये ६८,८४,१२०/- (अक्षरी रुपये अडुसष्ठ लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे वीस फक्त) (जीएसटीसह) यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
०२. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या १ वर्ष कालावधीच्या ऑनलाईन कामकाजाकरीता नव्याने निविदा प्रसिध्द करण्यास व यासाठी होणारा वार्षिक अंदाजे खर्च रुपये ७४,३४,८४९/- (अक्षरी रुपये चौऱ्याहत्तर लाख चौतिस हजार आठशे एकोणपन्नास फक्त) यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
०३. परिच्छेद क्र.१ येथे नमूद मान्यतेच्या अनुषंगाने आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदर एजन्सीशी उपरोक्त कालावधीसाठीचा करारनामा करावा. यात देखभाल, परवाना शुल्क, मदत कक्ष, आवश्यकतेनुसार करावयाचे बदल, इत्यादी बाबींचा समावेश करारनाम्यात असेल याची दक्षता घ्यावी.
०४. Talisma Corporation Pvt. Ltd. या संस्थेमार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजादरम्यान नव्याने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून नवीन एजन्सीची निवड झाल्यास Talisma Corporation Pvt. Ltd. या एजन्सीस १ महिना कालावधीची पूर्वसूचना देऊन एजन्सीशी करण्यात आलेला करार संपुष्टात आणावा.
०५. या प्रित्यर्थ होणारा खर्च मागणी क्रमांक ई-२,२२०२ सर्वसाधारण शिक्षण ८०- सर्वसाधारण पंचवार्षिक योजनांतर्गत योजना (०२) (५१) ई-गव्हर्नन्स कार्यक्रम (२२०२ एच ४५४) ३१ सहाय्यक अनुदाने या लेखाशिर्षाखालील संबधित वित्तीय वर्षात उपलब्ध तरतूदीमधून भागविण्यात यावा. यासाठी आयुक्त (शिक्षण)), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी व सहाय्यक संचालक, (लेखा), माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
०६. प्रस्तावांतर्गत कामाच्या अनुषंगाने सादर करण्यात येणाऱ्या देयकांची छाननी करुन त्यास मान्यता देण्यासाठी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे हे सक्षम प्राधिकारी असतील. अशी देयके मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात येऊ नयेत.
०७. शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत गठीत करण्यात आलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीस प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार व सदर समितीने घेतलेल्या संदर्भ क.३ येथील निर्णयानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
०८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६०१३०१५०६२३८४२१ असा आहे. सदरचा शासन निर्णय डिजीटल साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०२३/प्र.क्र.२४२/टीएनटी-१ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
