TET Mandatory for teachers appointed on compassionate grounds
TET Mandatory for teachers appointed on compassionate grounds
Regarding making it mandatory for teachers appointed on compassionate grounds to pass the Teacher Eligibility Test.
अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत.
दिनांकः ३१ जुलै, २०२५.
संदर्भ:-
१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समक्रमांक दिनांक २०.०१.२०१६
२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समक्रमांक दिनांक ०२.०९.२०२४
3) शासन शुध्दीपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समक्रमांक दि. २३.०९.२०२४
प्रस्तावना:-
संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयान्वये अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षणसेवकांना शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली होती. ती सवलत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मानकांशी विसंगत असल्याने संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये अशा शिक्षकांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून ०३ वर्षे कालावधीत शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले होते. संदर्भ क्र.३ येथील शुध्दीपत्रकान्वये ही मुदत ०५ वर्षे इतक्या कालावधीसाठी वाढविण्यात आली. अनुकंपा तत्वावर नियुक्त प्राथमिक शिक्षण सेवकांना अथवा शिक्षकांना दिनांक ०१.०९.२०२९ पर्यंत शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या मुदतीत सदर परिक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करुन अनुकंपा धोरणानुसार त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची तरतूद देखील संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण सेवक पदावर अनुकंपा धोरणानुसार नियुक्त झालेल्या ज्या उमेदवारांचा ०३ वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण झाला आहे व ज्यांची सेवा दिनांक ०१.०९.२०२९ पर्यंत चालू ठेवावयाची आहे त्यांना सेवासातत्य देण्यात यावे किंवा कसे याबाबत संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयात स्पष्टता नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे.
शासन निर्णय
शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण असणे ही अर्हता धारण न करण्याऱ्या व प्राथमिक शिक्षक/ शिक्षण सेवक पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या उमेदवारांच्या सेवासातत्याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
अ) दिनांक ०२.०९.२०२४ रोजी अथवा त्यापूर्वी ज्या उमेदवारांच्या सेवेस ०३ वर्षे पूर्ण झाली आहेत अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या सेवेस ज्या दिनांकास ०३ वर्षे पूर्ण झाली असतील त्या दिनांकापासून सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत. दिनांक ०१.०९.२०२९ पर्यंत त्यांनी शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण होणे होणे ही अहंता धारण न केल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात येवून संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकऱ्याने करावी.
ब) दिनांक ०२.०९.२०२४ नंतर ज्या उमेदवारांच्या सेवेस ०३ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांचा शिक्षण सेवक कालावधी कमाल मर्यादेत दिनांक ०१.०९.२०२९ पर्यंत वाढविण्यात यावा व त्यांना सेवासातत्य देण्यात येवू नये. दिनांक ०१.०९.२०२९ पर्यंत जे उमेदवार शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण ही पात्रता धारण करतील अशा उमेदवारांच्या बाबतीत ज्या दिनांकास त्यांच्या सेवेस ०३ वर्षे पूर्ण झाली आहेत त्या दिनांकापासून पूर्वलक्षी प्रभावाने सेवासातत्य व अनुषंगिक लाभ देण्यात यावेत. दिनांक ०१.०९.२०२९ पर्यंत त्यांनी शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण होणे ही अर्हता धारण न केल्यास त्यांची शिक्षण सेवक पदावरील सेवा समाप्त करण्यात येवून संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकऱ्याने करावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०७३११५१००६६४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०१५/प्र.क्र. ३०३/टिएनटि-१,मंत्रालय मुंबई ४०००३२
