Niyamit Shala Bheti
Niyamit Shala Bheti
niyamit shala bhetibabat
Regarding regular school visits
क्रमांक प्राशिसं/२०२५/नियमित शाळा/आस्था
दिनांकित स्वाक्षरी
संदर्भ-
१. शासन निर्णय क्र संकीर्ण ११२५/प्र.क्र. २५२/एसएम-१ दि. १२.०३.२०२५
२. दिनांक ९ मे २०२६ च्या बैठकीतील सूचना
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्रस्तावनेत पुढील प्रमाणे नमूद आहे भारताने २०१५ स्विकारलेल्या शाश्वत विकासाच्या २०३० च्या कृती कार्यक्रमाच्या उद्दिष्ट ४ (SDG४) मध्ये ‘जागतिक शिक्षण विकास कृती कार्यक्रम’ समाविष्ट असून हे उद्दिष्ट २०३० पर्यंत “सर्वांसाठी समावेशक आणि समान गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी निरंतर अध्ययनाच्या शिक्षणाच्या संधींना प्रोत्साहन देणे” यासाठी प्रयत्न करण्याविषयी आहे. या उत्तुंग उद्दिष्टाकरिता अध्ययनाला पाठिंबा देण्यासाठी आणि चालना देण्यासाठी संपूर्ण शिक्षण प्रणालीची नव्याने रचना करणे आवश्यक आहे. म्हणजे शाश्वत विकास कृती कार्यक्रम २०३० ची सर्व महत्त्वाची लक्ष्ये आणि उद्दिष्टे साध्य करता येतील.
सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण व निरंतर अध्ययनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण प्रक्रियेतील राज्यस्तरापासून शाळास्तरावरील सर्व घटक कार्यरत आहेत. या अनुषंगाने शासनाचे विविध उपक्रम, प्रकल्प, योजना यांची अंमलबजावणी शाळा स्तरावर होत आहे. जसे की मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दुपारचे भोजन, निपुण महाराष्ट्र अभियान, आदर्श शाळा, पीएम श्री शाळा, शाळांना अध्ययन साहित्य पुरवणे, नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT), शैक्षणिक व्हिडिओ, शिक्षक प्रशिक्षण, संशोधन विषयक उपक्रम, आनंददायी शनिवार, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न, राष्ट्रीय अविष्कार अभियानाअंतर्गत राज्यांतर्गत व राज्याबाहेरील विविध शैक्षणिक आणि वैज्ञानिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या अभ्यास भेटी इत्यादी विविध उपक्रम/योजना शासनामार्फत राबवण्यात येतात.
सदर उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे किंवा कसे? अंमलबजावणीमध्ये कोणत्या उल्लेखनीय बाबी वा त्रुटी आढळून येत आहेत? या अनुषंगाने सुधारणा, मार्गदर्शन, मदत उपलब्ध करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी प्रभावी शाळा भेटी महत्त्वाच्या आहेत. तसेच यावर्षी वरील नियमित उपक्रमाव्यतिरिक्त इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व सहावी साठी नवीन पाठ्यपुस्तके येणार आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण प्रशिक्षण होणार आहे या बाबींची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी शाळा भेटी करणे महत्त्वाचे आहे.
त्यास अनुसरुन निर्देशीत करण्यात येते की, शाळा भेटी या शैक्षणिक शाळा भेट स्वरूपाच्या असाव्यात. वार्षिक तपासणी, विशेष उपक्रमाच्या वेळी भेट (स्नेहसंमेलन, विविध स्पर्धा) चौकशी निमित्त भेट, परीक्षा काळातील भेट या व्यतिरिक्त सदरची शैक्षणिक शाळा भेट असणार आहे. यु-डायस प्लस मध्ये शाळा भेटी नोंदविण्याची सुविधा आहे. सन २०२५-२६ मध्ये राज्यभरात फक्त ११,५३२ शाळा भेटी झाल्याची नोंद आहे. सदरचे प्रमाण अतिशय कमी आहे, म्हणून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून विविध स्तरावरील अधिकारी यांना शैक्षणिक शाळा भेटीचे पुढीलप्रमाणे उद्दिष्ट देण्यात येत आहे :-
राज्यस्तरीय अधिकारी –
दर पंधरा दिवसातून किमान दोन शाळा
विभागस्तरीय अधिकारी
दर आठवड्याला किमान दोन शाळा
जिल्हास्तरीय अधिकारी –
दर आठवड्याला किमान दोन शाळा
तालुकास्तरीय अधिकारी –
दर आठवड्याला किमान तीन शाळा
अधिक्षक (शा.पो.आ.) –
दर आठवड्याला किमान चार शाळा
विस्तार अधिकारी (शिक्षण)
दर आठवड्याला किमान चार शाळा
समूह साधन केंद्र समन्वयक
दर आठवडयाला किमान पाच शाळा
सदर शाळा भेटी दरम्यान गुणवत्तेच्या विविध बाबी संबंधी सद्यस्थिती, आवश्यक मदत, मार्गदर्शन सुधारणा, सुधारण्यासाठी वाव, चांगल्या कामाचे कौतुक या अनुषंगाने बाबींची तपासणी केली जावी / करावी.
यानुसार सदर शाळा भेटी करताना प्रामुख्याने पुढील मुद्द्यांची पडताळणी / तपासणी करावी :-
१. शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती.
२. शाळा परिसर स्वच्छता व विद्यार्थी वैयक्तिक स्वच्छता.
३. वर्ग अध्यापन निरीक्षण (किमान १ वर्ग, १ तासिका).
४. विद्यार्थ्यांशी संवाद / प्रश्नोत्तरे याद्वारे त्यांची संपादणूक पडताळणी (किमान १ वर्ग).
५. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विद्यार्थी संपादणूक.
६. आनंददायी शनिवार अमंलबजावणी.
७. विविध स्पर्धा परीक्षा तयारी.
८. डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृध्दी कार्यक्रम अंमलबजावणी.
९. PM Poshan (मेनू, आहार चव, स्वच्छता इ.).
१०. शाळेत उपलब्ध विविध शैक्षणिक साहित्य, किट, लॅब व त्यांचा वापर.
११. शाळेत घेतले जाणारे खेळ व त्याबाबतची तयारी.
१२. विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात उपाययोजना.
१३. उपरोक्त मुद्यांच्या आधारे शाळेबद्दल सर्वसाधारण अभिप्राय (उल्लेखनीय बाबी, आढळलेल्या त्रुटी, सूचना इ.) नमूद करावा.
सदर शाळा भेटीचा अहवाल संबंधित अधिकारी यांनी सरल प्रणाली वर
www.education.maharashtra.gov.in
अपलोड करावा.
उपरोक्त नमूद मुद्यांच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये सर्व राज्यस्तरीय ते तालुकास्तरीय अधिकारी यांनी नियमितपणे शैक्षणिक शाळा भेटी कराव्यात व शाळा भेटीचा उपरोक्त नमूद मुद्येनिहाय अहवाल सरल प्रणालीवर सादर करावा. राज्य/विभाग/जिल्हा/तालुका स्तरावरील अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी यांच्या शाळा भेटीबाबत नियमितपणे आढावा घ्यावा.
Digitally signed by SACHINDRA PRATAP SINGH Date: 14-06-2026 16:10:52
(सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.) आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना), जिल्हा परिषद (सर्व)
४. शिक्षण निरीक्षक (उत्तर, दक्षिण, पश्चिम) बृहमुंबई
५. प्रशासन अधिकारी / शिक्षण प्रमुख/शिक्षणाधिकारी, मनपा/नपा/नप (सर्व)
