Kala Krida Shikshak Nemnuk
Kala Krida Shikshak Nemnuk
Appointment of sports arts teachers in schools in the state
Regarding appointment of sports/arts teachers in schools in the state
राज्यातील शाळामध्ये क्रीडा/कला शिक्षकांची नेमणूक करण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला मा शिक्षण मंत्री यांनी दिलेले उत्तर..!
राज्यातील शाळांमध्ये क्रीडा/कला शिक्षकांची नेमणूक करण्याबाबत
(१५) ६७४२ श्री. सतिश चव्हाण, श्री. विक्रम काळे, श्री. सुनिल शिंदे सन्माननीय शालेय शिक्षण
मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० नुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला व क्रीडा विषयांना इतर शैक्षणिक विषयांप्रमाणेच समान महत्त्व देण्यात आले असून, शासनाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर मात्र याची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने राष्ट्रीय व राज्यस्तरावर दर्जेदार खेळाडू घडवावयाचे असल्यास शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना शिस्तबध्द क्रीडा प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सध्या राज्यातील शासकीय व खाजगी अनुदानित शाळांमध्ये ५०० किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्येच क्रीडा/कला शिक्षकांची नेमणूक केली जाते, मात्र ४९९ किंवा
त्यापेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची नेमणूक न केल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षण व प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, तत्कालीन क्रीडा मंत्री महोदयांनी दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा शिक्षकांचा आकृतीबंध व संच मान्यता मंजूर करून क्रीडा शिक्षकांची भरती करण्याचे आश्वासन दिले आहे, हे ही खरे आहे काय,
(४) असल्यास, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांवर शिस्तबध्द प्रशिक्षण, मैदानी सुविधा आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी क्रीडा शिक्षकांची तात्काळ भरती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?
🙋 हे ही वाचा –
कला क्रीडा संगणक शिक्षक पदे मान्य अधिक वाचा या ओळीला स्पर्श करून
श्री. दादाजी भुसे :
(१) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील तरतूदीशी सुसंगती असावी म्हणून दिनांक १५/०३/२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये कला व क्रीडा विषयांच्या शिक्षकांचा संच मान्यतेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही पदे भरण्यास कोणतीही अडचण नाही.
(२), (३) व (४) शासन निर्णय, दिनांक १५/०३/२०२४ अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक शाळांसाठी इयत्ता १ ली ते १० वी च्या २५१ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांमागे ०१ विशेष शिक्षक (क्रीडा) व इयत्ता ८ वी ते १० वी च्या १५१ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांमागे ०१ विशेष शिक्षक (क्रीडा) पद अनुज्ञेय करण्यात आले आहे. तसेच त्यापुढे विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात क्रीडा शिक्षकांची पदे अनुज्ञेय करण्याची तरतूद उक्त शासन निर्णयामध्ये करण्यात आली आहे.
संच मान्यतेत कला व क्रीडा विषयांचा समावेश झाल्याने शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी-२०२५ मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे या पदांवर भरती होणार आहे. यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी संचमान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिध्द करणे आवश्यक आहे.
दिनांक ०२/०१/२०२६ च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेअंतर्गत प्रत्येक केंद्रस्तरावर ०१ याप्रमाणे राज्यात क्रीडा या संवर्गातील ४८६० पदांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आला आहे. मूळ मंजूर पायाभूत पदांच्या मयदित ही पदे असल्याने ती भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही प्रगतीत आहे. केंद्रस्तरीय शाळेसाठी ०१ क्रीडा शिक्षक नियुक्ती करण्यात येणार असल्याने त्यांची सेवा इतर सर्व शाळांना उपलब्ध होणार आहे.
(५) प्रश्न उद्भवत नाही.
