Maximum Age Limit Government Services
Maximum Age Limit Government Services
raising the maximum age limit for entry into government services
शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविणेबाबत.
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांकः एसआरव्ही २०१५/प्र.क्र.४०४/कार्या.१२
मंत्रालय, मुंबई
तारीख: २५ एप्रिल, २०१६
वाचा :-
१) शासन निर्णय क्रमांकः सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-१०९२/प्र.क्र.१४/९२/१२, दि.२८ ऑक्टोबर, १९९२
प्रस्तावना :-
शासन निर्णय क्रमांक-एसआरव्ही-१०९२/प्र.क्र.१४/९२/१२, दि.२८.१०.१९९२ अन्वये शासन सेवेतील गट-अ ते गट-ड मधील पदांवर नियुक्तीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३० वर्षे व मागासवर्गीयांसाठी ३५ वर्षे कमाल वयोमर्यादा विहित करण्यात आलेली होती. तद्नंतर शासन निर्णय दि.१७.०८.२००४ अन्वये शासन सेवेतील गट-अ ते ड मधील सर्व पदांवर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३३ वर्षे व मागासवर्गीयांसाठी ३८ वर्षे इतकी करण्यात आली. सदर वयोमर्यादा महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विविध मंत्रालयीन विभागांनी/विभाग प्रमुखांनी नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय निवडसमित्या, विभागीय स्तरावरील निवडसमित्या व जिल्हानिवड समित्या यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या निरनिराळ्या पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षाअन्वये शासन सेवा प्रवेशासाठी लागू करण्यात आली होती. शासन सेवा प्रवेशासाठी वयोमर्यादा वाढविणेबाबत विविध लोकप्रतिनिधी व मा. मंत्री तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवार यांचेकडून मागण्या/निवेदने प्राप्त झाली होती. त्यानुसार शासन सेवा प्रवेशासाठी वयोमर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय :-
२. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विविध मंत्रालयीन विभागांनी/विभाग प्रमुखांनी नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय निवडसमित्या, विभागीय स्तरावरील निवडसमित्या व जिल्हानिवड समित्या यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या निरनिराळ्या पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षाअन्वये शासन सेवेतील प्रवेशासाठी, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सध्या कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे आहे त्यामध्ये ५ वर्षानी वाढ करुन त्यांची कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी सध्या कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आहे त्यामध्ये ५ वर्षानी वाढ करुन त्यांची कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे करण्यात येत आहे.
३. या शिवाय ज्या प्रवर्ग / घटकांकरीता सध्या असलेली कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नाही.
४. एखाद्या पदाच्या भरतीच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने/संबंधीत निवडसमितीकडून जाहिरात दिली असेल व जाहिरातीनुसार अर्ज करण्याची मुदत या निर्णयाच्या दिनांकापूर्वी संपली
असेल, अशा प्रकरणी सदर वाढीव वयोमर्यादा लागू होणार नाही. सबब या पुढील भरती प्रक्रियेसाठी सदर वाढीव मर्यादा लागू राहील.
५. मंत्रालयाच्या विविध विभागांनी आपापल्या कक्षेतील पदांच्या संदर्भात संबंधित सेवाप्रवेश नियमात वरील बदल अंतर्भूत करण्याची कार्यवाही करावी आणि अशाप्रकारे कार्यवाही पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीतील नेमणूका देखील या वाढीव वयोमर्यादेनुसार कराव्यात.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐 👉 www.maharashtra.gov.in 👈 या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०४२५१५४८५३११०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
अपर मुख्य सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन