क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले पुण्यस्मरण दिन Krantisurya Mahatma Jyotiba Phule

Krantisurya Mahatma Jyotiba Phule

Krantisurya Mahatma Jyotiba Phule

Mahatma Jyotiba Phule Punytithi

Mahatma Jyotiba Phule death anniversary,

भारतातील महान समाजसुधारक, क्रांतिसूर्य, महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज पुण्यस्मरण दिन विनम्र अभिवादन !

भारतातील महान समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक, शिक्षणतज्ञ, क्रांतिकारी विचारवंत, धर्मचिकित्सक, स्त्री उद्घारक, शेतकऱ्यांचे कैवारी, उद्योगपती, लेखक, सत्यशोधक, शिवशाहीर, शिवजयंतीचे जनक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते. ज्योतिबा अवघ्या नऊ महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे पालनपोषण व मार्गदर्शन त्यांची मावस बहिण सगुणाबाई यांनी केले. त्यांचे मूळ आडनाव गो-हे असे होते. परंतु त्यांचे वडील व दोन चुलते हे पुण्यातील पेशव्यांना फुले पुरवण्याचे काम करत. त्यामुळे त्यांचे आडनाव फुले असे रूढ झाले. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह ९ वर्षीय सावित्रीबाई यांच्याशी झाला. सावित्रीबाई या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या होत्या.

अधिक जाणून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बद्दल या ओळीला स्पर्श करून

सुरुवातीला १८३४ ते १८३८ या काळात ज्योतिबाने पंतोजींच्या मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. परंतु त्या काळात झालेल्या सामाजिक विरोधामुळे गोविंदरावांनी ज्योतिबाला शाळेतून काढून टाकले. पुढे त्यांच्या शेजारी असलेल्या गफार बेग मुन्शी व लिजीट साहेब या गृहस्थांनी गोविंदरावांना समजावून सांगितले. त्यामुळे पुन्हा ज्योतिबांना पुण्यातील इंग्रजी मिशनरी शाळेत टाकण्यात आले. तेथे १८४१ ते १८४७ या काळात त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. याच काळात त्यांनी क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीत शारीरिक व क्रांतिकारी विचारांचे धडे गिरवले. तसेच थॉमस पेन यांच्या ‘राईट ऑफ मॅन’ या ग्रंथाच्या वाचनाने त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांच्या विचारात आमूलाग्र बदल झाला. ते महात्मा कबीर, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज यांना आपले आदर्श मानत. तर पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्योतिरावांना आपले गुरू मानू लागले.

एके दिवशी आपल्या उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या वरातीतून ज्योतिरावांना शुद्र असे संबोधून हाकलून देण्यात आले व त्यांचा अपमान केला. या घटनेमुळे ते खूप व्यथित झाले. त्यामुळे त्यांनी समाजातील जातीभेद, अस्पृश्यता, अज्ञान, अंधश्रध्दा, दारिद्रय, अनिष्ठ रूढी परंपरा, धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्याचा दृढनिश्चय केला. समाजातील मुली व बहुजन समाजाच्या शिक्षणाशिवाय समाजाला तरणोपाय नाही; हा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे त्यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. यामध्ये सुरुवातीला फक्त सहाच मुलींचा समावेश होता. यात उच्चवर्णीय मुली देखील शिक्षण घेत होत्या. मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रथम आपली पत्नी सावित्रीबाई हिला शिक्षण दिले व त्यांची या शाळेत शिक्षिका व मुख्याध्यापिका म्हणून नेमणूक केली. त्यामुळे सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका ठरल्या. त्यांच्या या कार्यात ज्योतिरावांचे मित्र उस्मान शेख व त्यांच्या भगिनी फातिमा शेख यांनी सहकार्य केले. पुढे फातिमा या देखील त्यांच्या शाळेत अध्यापनाचे काम करू लागल्या. पुढे त्यांनी पुणे व पुणे परिसरात समाजातील अस्पृश्य व दीनदलित मुला-मुलींसाठी अनेक शाळा सुरू केल्या. त्यांच्या या शैक्षणिक कार्यामुळे १६ नोव्हेंबर १८५२ रोजी मेजर थॉमस कँडी या इंग्रज अधिकाऱ्याच्या हस्ते पुण्यातील विश्रामबाग वाड्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. परंतु समाजातील होणाऱ्या विरोधामुळे त्यांच्या वडिलांनी मात्र या फुले दाम्पत्याला घरातून हाकलून दिले. तरीही त्यांनी घराचा त्याग केला मात्र हाती घेतलेले समाजकार्य सोडले नाही. तसेच काही सनातन्यांनी त्यांना मारण्यासाठी दोन मारेकरी पाठवले, परंतु ज्योतिरावांनी त्यांना समाजावून सांगून त्यांचे मतपरिवर्तन केले. पुढे तेच मारेकरी ज्योतिरावांचे सहकारी, अंगरक्षक व अनुयायी बनले.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

त्यांनी सुरुवातीला बालविवाहांना विरोध केला. अशा अकाली वैधव्य आलेल्या महिलांच्या बाळांतपणासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची (१८६३) स्थापना केली. विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन देऊन त्यांनी विधवा विवाह (१८६४) घडवून आणला. तसेच विधवांच्या केशवपन पध्दतीला विरोध करून न्हावी समाजाचा संप (१८६५) घडवून आणला. या विधवांपैकी काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. पुढे त्याचे नाव यशवंत ठेवून त्याला डॉक्टर बनविले. परंतु मूलबाळ होत नाही म्हणून ज्योतिरावांनी दुसरा विवाह केला नाही. तसेच १८६८ साली त्यांनी आपल्या वाड्यातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.१८६९ साली रायगडावर जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्यावर पहिला पोवाडा लिहिला. तसेच १८७० साली त्यांनी भारतातील पहिली शिवजयंती साजरी केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचार व धार्मिक गुलामगिरीतून समाजाची मुक्तता करण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. १८७५ साली अहमदनगर येथे शेतकऱ्यांसाठी खतफोडीचे बंड उभारले. १८८० साली नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेल्या भारतातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. १८७६ ते १८८२ या काळात ते पुणे नगरपालिकेचे सभासद होते. यावेळी त्यांनी दुष्काळात होरपळलेल्या मुलांसाठी तब्बल नऊ महिने अन्नछत्र चालविले. पैशाची उधळपट्टी न करता शिक्षणावर खर्च करावा, असा आग्रह धरला. तसेच पुण्यातील दारूविक्रीला विरोध केला. पुण्यातील खडकवासला धरण, कात्रजचा बोगदा, येरवडा पूल व कारागृह आदींच्या बांधकामासाठी त्यांनी विविध प्रकारचे बांधकाम साहित्य पुरविले. १८८२ साली विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. २ मार्च १८८८ रोजी इंग्लंडचा राजपुत्र ड्यूक ऑफ कॅनॉटच्या सत्कार समारंभ प्रसंगी ज्योतिरावांनी एका साध्या शेतकऱ्याच्या वेशात उपस्थित राहून त्यांना भारतातील जनतेची सद्यस्थिती निदर्शनास आणून दिली. तसेच त्या काळात काँग्रेस /भारतीय राष्ट्रीय सभा ही भटजी आणि शेटजी यांची असून त्यामध्ये गोरगरीब शेतकरी, कष्टकरी तसेच ब्राह्मणेतर समाजाचा समावेश नाही, असा आरोप त्यांनी केला. १८८९ च्या मुंबईतील काँग्रेस अधिवेशनावेळी त्यांनी ३० फूट शेतकऱ्याचा गवताचा पुतळा उभा केला.

ज्योतिरावांचे मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, उर्दू, मोडी या भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी तृतीयरत्न हे नाटक (१८५५), छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा (१८६९), ब्राह्मणांचे कसब (१८६९), गुलामगिरी (१८७३), शेतकऱ्याचा आसूड (१८८३), सत्सार (१८८५), इशारा (१८८५), अखंडादी काव्यरचना (१८८७), सार्वजनिक सत्यधर्म (१८९१, मरणोत्तर प्रकाशित) यासारख्या मार्गदर्शक, प्रेरणादायी, क्रांतिकारी विचारांच्या, विद्रोही पुस्तकांचे लेखन केले. ११ मे १८८८ रोजी मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली. अशा या आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या समाजसुधारकाचे २८ नोव्हेंबर १८९० रोजी पुणे येथे निधन झाले. पुढे महात्मा गांधी यांनी ज्योतिरावांचा उल्लेख ‘महात्म्यांचा महात्मा’ असा केला. तसेच त्यांना ‘महाराष्ट्राचा मार्टिन ल्यूथर किंग’ असेही संबोधले जाते.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्नमंजुषा A quiz highlighting the life and On life work of Krantisurya Mahatma Jyotiba Phule

Leave a Comment

error: Content is protected !!