Hind ki Chadar
Hind ki Chadar
Regarding the organization of the program on the occasion of the 350th martyrdom anniversary of “Hind-ki-Chadar” Shri Guru Tegh Bahadur SahibJi
विषय :- “हिंद-की-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजनबाबत..
संदर्भ :- अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. माअअ-२०२५/प्र.क्र.२०६/का.१, दिनांक १० ऑक्टोबर, २०२५
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संदर्भीय शासन पत्रान्वये शासनाने अल्पसंख्यांक विकास विभाग, यांचे सहपत्रामध्ये हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहिदी समागम शताब्दी कार्यक्रम नांदेड, नागपूर आणि नवी मुंबई येथे आयोजित करण्याकरिता मा. मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे दिनांक १३.०६.२०२५ रोजी बैठक पार पडली असून सदर बैठकीचे इतिवृत्त अल्पसंख्यांक विकास विभगाच्या दिनांक २१.०८.२०२५ रोजीच्या पत्रान्वये निर्गमित करण्यात आले आहे. बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समन्वय समिती दिनांक १२.०९.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये गठित करण्यात आली आहे. “हिंद-की-चादर” श्री गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे ठिकाण व त्यात समाविष्ट असलेले जिल्हे संदर्भाधीन क्रमांक १ च्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहेत.
बैठकीच्या इतिवृत्तामध्ये नमूद केल्यानुसार नियोजित कार्यक्रमाच्या किमान दोन आठवडे आधीपासून राज्यातील सर्व शाळा / महाविद्यालयांमध्ये श्री. गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रकला स्पर्धा/वक्तृत्व स्पर्धा/निबंध स्पर्धा/विविध व्याख्याने/प्रभात फेरीचे आयोजन करुन विजेत्यांना प्रमाणपत्र/पारितोषिकाचे वाटप करण्याबात आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना तातडीने निर्गमित करण्यात याव्यात.
“हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहिदी समागम शताब्दी कार्यक्रमाबाबत मा. मुख्यमंत्री सचिवालयाकडून पाठपुरावा सुरु असल्याने सदर कार्यवाही प्राधान्याने करावी असे सूचित करण्यात आलेले आहे. (सोबत संदर्भीय शासन पत्रासोबत सहपत्रांच्या प्रती जोडलेल्या आहेत.)
अ.क्र.ठिकाण कार्यक्रमाचा संभाव्य दिनांक समावेश असलेले जिल्हे
१ नांदेड १६ नोव्हेंबर, २०२५
छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे, जळगाव.
२ नागपूर ०६ डिसेंबर, २०२५
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम.
३ नवी मुंबई २१ डिसेंबर, २०२५
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक.
त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना संदर्भीय पत्रातील बाबी निदर्शनास आणाव्यात. तसेच आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस सूचित करुन त्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा.
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
